आपल्या वक्तव्यामुळे नेहमी भाजपाला अडचणीत आणणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नसल्याचा टोला लगावत त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असा सल्ला देत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव यांचे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.

‘दि क्विंट’ या वेबसाईटशी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाबद्दलही महत्वपूर्ण वक्तव्य केले.

मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील एकही मंत्री असा नाही ज्याला अर्थशास्त्र कळते, अशी टीका त्यांनी केली. नंतर आपलेच वक्तव्य सावरत त्यांनी इतर पक्षांनाही दोष दिला. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजून घेणारा एकही नेता विरोधी पक्षात नसल्याचे त्यांनी म्हटले.

वर्ष २०१६ मध्ये स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांची तक्रार केली होती. राजन हे मानसिकरित्या पूर्णपणे भारतीय नसून ते जाणूनबुजून आपली अर्थव्यवस्था बिघडवत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. राजन यांच्यावर हल्लाबोल करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नव्हती.

याबाबत स्वामी म्हणाले की, राजन यांनी व्याजाचे दर वाढवले होते. याचा लघु उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे देशात बेरोजगारी वाढली होती. यामुळे अर्थव्यवस्था उद्धवस्त होत होती. पण हे मानायला ते तयारच नव्हते.

भारताने जर योग्य धोरणे राबवली तर चीनला मागे टाकण्याची आपल्यात क्षमता आहे. मी नेहमी देशाचा अर्थमंत्री कोण आहे, यावरून संभ्रमावस्थेत असतो. एकतर तुम्ही अर्थमंत्री आहात किंवा नाहीत. हंगामी अर्थमंत्री वगैरे असे काही नसते. काही ठिकाणी पीयूष गोयल अर्थमंत्री असल्याचे सांगण्यात येते. पण अर्थमंत्रालयाच्या वेबसाईटवर जेटली अर्थमंत्री असल्याचे दिसते. म्हणजे जेटली हे बिनखात्याचे मंत्री आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला.

मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरून कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही की नरसिंह राव किंवा मोरारजी देसाईंना. देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. आता उर्वरित वर्षांत ते वेगाने पुढे जातील आणि चांगली कामगिरी करतील. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत भाजपा ३०० च्या आसपास जागा जिंकेल असे त्यांनी म्हटले.