कर्नाटकातील मंगळुरू येथील एका नगरसेवकानं आपल्या कर्तव्याला जागत स्वतः केलेल्या सेवाभावी कृत्यातून सर्वांची मनं जिंकली आहेत. ड्रेनेज लाईनच्या मॅनहोलमध्ये उतरुन ते स्वतः स्वच्छता केल्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. कादरी-कंबाला वॉर्डचे भाजपाचे नगरसेवक असलेल्या मनोहर शेट्टी यांचं नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.

कादरी-कंबाला या वॉर्डमध्ये रस्त्याखालून गेलेली ड्रेनेजची लाईन तुंबली होती. यातील पाईपमध्ये कचरा अडकल्याने ते तुंबून सर्व पाणी बाहेर येत होते. त्यामुळे फुटपाथवरुन चालणाऱ्यांना तसेच रस्त्यावरील वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याच दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानंतर कोणीही ते दुरुस्त करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरण्यास तयार होईना. शेवटी नगरसेवक असलेल्या शेट्टी यांनी स्वतः त्यात उतरुन पाईपमध्ये अडकलेला कचरा बाहेर काढला. शेट्टी यांच्या या सेवाभावी कृतीमुळे सोशल मीडियातून सातत्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.

हा ड्रेनेज साफ करण्याचे अनेक प्रयत्न आधीच अयशस्वी झाले होते. त्यानंतर शेट्टी यांनी मजुरांना काम मिळवून देण्याच्या उद्देशाने पाचारण केले. परंतू, पावसाळ्यात भरुन वाहणाऱ्या नाल्यात प्रवेश करणे धोक्याचे असल्याचे कारण देऊन मजुरांनी आत उतरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी पालिकेचे हायस्पीड पाण्याचा फवारा मारणारे वाहन बोलावले. मात्र, ही कल्पनाही यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट होत असल्याचे दिसताच शेट्टी यांनी स्वतःच मेनहोलमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

नगरसेवक शेट्टी यांनी इतर चार मजुरांसह अर्धा दिवस हे ड्रोनेज साफ करण्यात खर्ची घातला आणि अखेर पाईपमध्ये अडकलेला कचरा बाहेर काढला. यावर बोलताना शेट्टी म्हणाले, “आम्ही गरीब लोकांना मॅनहोलमध्ये उतरुन आमच्यासाठी पाईप स्वच्छ करण्याची जबरदस्ती करु शकत नाही. जर काही चुकीचं घडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मीच धोका पत्करत मेनहोलमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यावर अवलंबून राहिलो नाही.”

शेट्टी पुढे म्हणाले की, “आपण या मेनहोलमध्ये पब्लिसिटीसाठी उतरलो नव्हतो. हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. कारण आपण लोकांनी निवडून दिलेले त्यांचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे जर आपण एखादी गोष्ट लगेच करु शकणार असून तर ती करायला हवी. गरज पडलीच तर मी पुन्हा मॅनहोलमध्ये उतरुन स्वच्छता करण्यास तयार आहे. जर लोकांना माझ्या वॉर्डमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्याची प्राथमिक जबाबदारी माझ्यावरच येते, असेही त्यांनी म्हटले आहे.