दलित संघटनांकडून देशभरात झालेल्या तीव्र आंदोलनानंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र यांनी विरोधी पक्षांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरुन फक्त राजकारण केल्याचा आरोप केला आहे. सोबतच आमच्या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचा जितका सन्मान केला तितका कोणत्याच सरकारने केला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीत सुरु करण्यात आलेले प्रोजेक्ट्स पुर्ण करत आम्ही आंबेडकरांना योग्य ते स्थान दिलं आहे असंही नरेंद्र मोदी यावेळी बोलले आहेत. अलिपूर रोडवरील घर जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला ते घर १३ एप्रिलला देशाला समर्पित करण्यात येईल असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

प्रत्येकजण फक्त राजकीय फायद्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करत होतं असा आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. आमचंच सरकार होतं, ज्याने आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं काम पूर्ण केलं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हा प्रोजक्ट आखण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सरकारने कित्येक वर्ष हा प्रोजेक्ट प्रलंबित ठेवला असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य त्यावेळी आलं आहे जेव्हा देशभरात दलित आणि आदिवासी अत्याचारविरोधी कायद्यावरुन (अॅट्रॉसिटी) दलित संघटनांच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. राजस्थानमध्ये तर संतप्त सवर्णांच्या गटाने भाजपाच्या दलित समाजाच्या आमदार आणि काँग्रेसच्या माजी आमदाराची घरे जाळली. बंददरम्यान एकूण ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.