देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे आरोग्य सेवा देखील कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रूग्णालयांमध्ये बेड्स, व्हेंटिलटर्स, ऑक्सिजनसह लस व इंजेक्शनचा देखील तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लसीकरणासाठी नागरिकांना लसीकरण केंद्राबाहेर दिवसदिवस रांगेत उभा राहावं लागत आहे. तर, पंतप्रधान मोदींनी देशभरात लस महोत्सव साजरा करण्याचे राज्यांना आवाहन केल होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी जोरदार टीका केली आहे. शिवाय, पीएम केअर्स फंडबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.

लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र

“ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

या अगोदर देखील राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावरून टीका केली होती. “३८५ दिवसातही करोनाशी लढाई जिंकता आली नाही – उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या..” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

“उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या ; इव्हेंटबाजी कमी करा…”

तसेच, “पंतप्रधान मोदी तुम्ही म्हणाला होता की करोना विरोधातील लढाई १८ दिवसांत जिंकली जाईल. तुम्ही टाळ्या- थाळ्या वाजवून घेतल्या, मोबाइलचा लाईट देखील लावायला लावला मात्र करोना वाढतच गेला. आता दुसरी लाट आहे आणि लाखो लोकं करोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा आणि जे आपले गरीब बांधव आहेत. त्याना उत्पन्नासाठी पूर्णपणे सहकार्य करा.” असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे.

“अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी!”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

या अगोदर देखील देशातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलेला आहे. “केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयानक दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे.” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

तर, करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं होतं. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केलं होतं.