तालिबानच्या म्होरक्याचा इशारा
अफगाणिस्तानातून परदेशी सैन्य माघारी जाईपर्यंत शांततेची अपेक्षा करू नये, असा इशारा तालिबानने अफगाणिस्तानच्या सरकारला दिला आहे. सरकारला शांतता हवी असल्यास प्रथम अमेरिकेसमवेत केलेला करार रद्द करावा आणि सर्व परदेशी सैन्याला माघारी पाठवावे, असे तालिबानच्या नव्या म्होरक्याने स्पष्ट केले आहे.
इद-उल-आधा या मुस्लीम सणाचे निमित्त साधून मुल्लाह मन्सूर याने एका संदेशाद्वारे ही मागणी केली आहे. अफगाणिस्तान सरकारला देशात शांतता प्रस्थापित करावयाची असल्यास परदेशासमवेत करण्यात आलेले सर्व लष्करी आणि सुरक्षाविषयक करार संपुष्टात आणावे, असे मन्सूरने संदेशात म्हटले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरक्षाविषयक करार करण्यात आला होता.
सदर सैन्य दररोज तालिबान्यांशी लढत नाही तर प्रशिक्षण, पाठिंबा आणि दहशतवादाचा मुकाबला यावर त्यांचा भर आहे.
शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वप्रथम अमेरिकेचे सैन्य माघारी पाठवावे ही चर्चेसाठी अत्यावश्यक अट असल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे सैन्य नसल्यास अफगाणिस्तानमधील समस्या अंतर्गत समझोत्याद्वारे सोडविता येणे शक्य आहे, असे तालिबानने म्हटले आहे.