अलाहाबाद उच्च न्यायालयाने कुंभमेळ्यात गंगेत स्नान करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत असे आदेश माध्यमांना दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा न्यायालयाने दिला आहे. स्नान घाटाच्या १०० मीटरपर्यंतच्या परिसरात फोटो काढण्यावरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. न्या. पीकेएस बघेल आणि पंकज भाटिया यांनी हे आदेश दिले आहेत.

गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. असीम कुमार नावाच्या एका व्यक्तीने यासंबंधीची याचिका दाखल केली होती. याचिकेवरील पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार आहे. या आदेशामुळे वृत्तपत्रे, साप्ताहिके अथवा अन्य नियतकालिकांना महिलांच्या आंघोळींचे फोटो छापता येणार नाहीत. तसेच टीव्ही वाहिन्यांना आंघोळीची दृश्ये अथवा फोटो दाखविता येणार नाहीत.

आज तिसरं आणि शेवटचं शाही स्नान –
कुंभमेळ्यात आज (रविवारी) तिसरे शाही स्नान होणार आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर प्रयाग संगमावर हे तिसरे शाही स्नान होत आहे. २ कोटी भाविक संगमावर स्नान करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीला पहिले शाही स्नान तर ४ फेब्रुवारी रोजी मौनी अमावास्येला दुसरे शाही स्नान झाले होते.