बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगाराला दयेचा अर्ज करण्याची मुभाच असू नये, अशी मागणी भाजप नेत्यांनी मृत बलात्कार पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी आयोजित शोकसभेत केली.  राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील असताना त्यांनी मंजूर केलेल्या दयेच्या अर्जात बलात्काऱ्यांनाही माफी मिळाली होती.
दिल्लीत सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या मृत तरुणीला न्याय मिळावा म्हणून सलग तिसऱ्या दिवशीही जंतरमंतरवर शांततामय निषेध सुरू होता. या आंदोलनामुळे इंडिया गेट व रायसीना हिल्सपाशी वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी आज शिथिल करण्यात आली आणि मेट्रो रेल्वेची स्थानकेही सुरू करण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीकरांनी नववर्षांच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द केले आहेत.
शोकसभेत लोकसभेतील विरोधीपक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी त्या तरुणीवर गूपचूप झालेल्या अंत्यसंस्काराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारवर हल्ला चढविला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसप्रणीत सरकारने बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या पाच गुन्हेगारांचे दयेचे अर्ज मंजूर केले आहेत. बलात्काराचे खटले विशेष न्यायालयात चालवावेत आणि सहा महिन्यांत त्यांचा निकाल लागावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बलात्कारासंबंधातील कायद्यांचा फेरविचार करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची आपली मागणी सरकारने धुडकावली. स्त्रियांच्या सुरक्षेबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या मागणीलाही सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्दय़ाची तड आपण लावू, असेही स्वराज यांनी सांगितले.
सभ्यतेच्या प्रयोगात आमचा समाज अपयशी ठरला आहे, अशी भावना अरुण जेटली यांनी व्यक्त केली.
१५ लाखांची भरपाई, नोकरी
मृत तरुणीच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची भरपाई तसेच तिच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कायद्यात बदल करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीकडे सूचना कराव्या, असे आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांना पत्र लिहून आवाहन केले. न्या. वर्मा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संसदेचे अधिवेशन बोलविण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.
नव्या वर्षांवरही शोककळा
नववर्षांच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील बहुतांश सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. बलात्काराच्या प्रकरणाचे इंडिया गेट आणि परिसरात िहसक पडसाद उमटल्याने या भागात गेल्या दोन दिवसांपासून प्रवेशबंदी होती. पण ती आज शिथिल करण्यात आली आणि मेट्रो रेल्वेची बंद केलेली सर्व स्थानके सुरू करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
हसन : कर्नाटकाच्या हसन जिल्ह्य़ातील कट्टाया गावात १३ वर्षांच्या एका शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या रंगराजु याला सोमवारी अटक झाली. १८ डिसेंबरला हा गुन्हा घडला होता. संध्याकाळी शिकवणी वर्गावर या मुलीला दुचाकीवरून सोडण्याची विनंती तिच्या आईने रंगराजुला केली होती. वाटेत अज्ञात स्थळी तिला नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. या गोष्टीचा बभ्रा झाल्यानंतर तो फरारी झाला होता.
नपुंसक करण्याची सूचना
कोची : बलात्कार आणि खून या गुन्ह्य़ातील गुन्हेगारांना फाशी द्यावी किंवा रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यांना नपुंसक करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी येथे केली. नायडू यांच्या अध्यक्षतेखालील गृह मंत्रालयविषयक संसदीय स्थायी समितीनेही अशी मागणी केली असून ती गृह मंत्र्यांच्या विचाराधीन आहे. बलात्काराच्या खटल्यांसाठी प्रत्येक जिल्ह्य़ात विशेष न्यायालय स्थापावे, खटल्याचे कामकाज गोपनीय चालवावे आणि तीन महिन्यांत निकाल लागावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. काँग्रेसनेही अत्यंत घृणास्पद गुन्ह्य़ांतील गुन्हेगारांना नपुंसक करण्याची व तीस वर्षे तुरुंगवासाची मागणी केली आहे.