स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देशवासियांना संबोधित केले आहे. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच देशाला संबोधित करताना २०२२ पर्यंत भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. ‘न्यू इंडियामध्ये गरिबीला कोणतेही स्थान नसेल,’ असेही राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात म्हटले. स्त्री-पुरुष यांच्यातील भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन त्यांनी भाषणाच्या माध्यमातून केले. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘देशवासियांनी कुटुंबासोबत समाजाचा विचार करायला हवा. राष्ट्र निर्माणाच्या कामात योगदान देण्याचा विचार सर्व देशावासियांनी करायला हवा. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत देशातील सर्व घरांपर्यंत वीज पोहोचायला हवी. याशिवाय चांगले रस्ते, रेल्वेचे जाळे, दळणवळणाच्या सुविधा यांचा वेगाने विकास व्हायला हवा. या प्रक्रियेत देशवासियांनी सक्रीय सहभाग घ्यायला हवा,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी ‘न्यू इंडिया’बद्दल भाष्य केले.

‘संवेदनशील समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. यासोबतच धर्माच्या आधारेदेखील भेदभाव केला जाऊ नये. कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून प्रत्येक भारतीयाने स्वत:च्या क्षमतांचा विकास करायला हवा. देशाच्या प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. सर्वांनी मिळून अशा देशाची निर्मिती करावी, जिथला प्रत्येक नागरिक सुखी असेल,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.