मेरठचे नाव पंडित नथुराम गोडसे नगर करण्याचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने दिले आहे. मेरठसह तीन जिल्ह्यांची नावं योगी सरकार बदलणार असल्याचे वृत्त विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने हे स्पष्टीकरण दिले.

उत्तर प्रदेश सरकारने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, गाझियाबाद, मेरठ आणि हापूर जिल्ह्यांची नाव बदलण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. सरकारने म्हटले की, IGRS हे सरकारी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आहे जी ऑटो रिस्पॉन्स मोडवर चालते आणि यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि मागण्या स्वयंचलितपद्धतीने संबंधीत जिल्हा प्रशासनाकडे पाठवून देते. त्यामुळे सरकारने अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला नाही.

मेरठ जिल्ह्याचे नाव बदलून पंडित नथुराम गोडसे नगर, गाझियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर आणि हापूर जिल्ह्याचे नाव महंत अवैद्यनाथ नगर असे नामांतर करण्याचे अनेक प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारच्या एकिकृत तक्रार निवारण प्रणालीद्वारे (IGRS) प्रशासनाकडे आले होते.