पंतप्रधान नरेंद्र मोदी बालपणी चहा विकायचे ती गुजरातमधील वडनगर स्थानकावरील टपरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. संसदेत लेखी उत्तरात केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती दिली.

वडनगर रेल्वे स्थानकात एक चहाची टपरी असून, बालपणी नरेंद्र मोदी याच टपरीवर चहा विकायचे, असं सांगितलं जात होतं. मागील लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी या चहाच्या टपरीच्या निमित्तानं ताज्या केल्या होत्या. मोदींच्या बालपणाची आठवण असलेल्या या चहाच्या टपरीमुळं वडनगर रेल्वेस्थानक चर्चेत आलं आहे. रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाकडून हेच रेल्वे स्थानक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केलं जाणार आहे. वडनगर रेल्वेस्थानक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केलं जाणार असलं तरी ही चहाची टपरी विकसित केली जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ही टपरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, अशी माहिती गेल्याच महिन्यात शर्मा यांनी दिली होती. मोदी चहा विकायचे त्या टपरीला आधुनिक रुपडं दिलं जाईल, पण ते करताना जुन्यातील गंमत हरवू देणार नाही, असंही त्यांनी गांधीनगर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं होतं.

गेल्याच महिन्यात महेश शर्मा यांच्यासह सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वडनगरला भेट दिली होती. त्यावेळी रेल्वे स्थानकाचीही पाहणी केली होती. वडनगर रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामाची पाहणीही शर्मा यांनी अधिकाऱ्यांसोबत केली होती. वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जन्मगाव आहेच, पण त्याचबरोबर या गावात शर्मिष्ठा तलावासह इतरही काही महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं आहेत. वडनगर, मोधेरा आणि पाटण ही तीन ठिकाणं पर्यटनस्थळं म्हणून विकसित करण्याची योजना आहे.