केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेणार नसल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ब्रिक्स देशांच्या परिषदेहून परतताना पत्रकारांशी बोलताना समाजवादी पक्ष यूपीएचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे गुरुवारी म्हटले होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोघांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यामुळेच केंद्र सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर यादव यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेणार नसल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षातील संबंध इतके काही टोकाला गेलेले नाहीत. पंतप्रधानांनी कोणत्या आधारावर पाठिंबा काढण्याबाबतची शक्यता व्यक्त केली, हे मला माहिती नाही. पाठिंबा काढण्याबाबत आमच्या पक्षामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे पाठिंबा काढण्याचा प्रश्नच नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. यूपीए सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे आठ ते नऊ महिने उरले आहेत. थोडक्यासाठी पाठिंबा काढून घेऊन काय उपयोग, असेही यादव यांनी सीएनएन-आयबीएन वृत्तवाहिनीला सांगितले.