26 February 2021

News Flash

शिक्षणात राजकारण नको; रमेश पोखरियाल यांचे आवाहन 

अभ्यासक्रमातील कपातीवर व झालेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्यासाठी पोखरियाल यांनी ९ ट्वीटची मालिका सादर केली.

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अभ्यासक्रमात तीस टक्के कपात करण्यासाठी निवडलेल्या धडय़ांवरून टीका सहन करावे लागलेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी टीकाकारांना, शिक्षणात राजकारण न आणण्याची ‘सूचना’ केली आहे.

‘सीबीएसई’च्या नववी ते बारावी या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांतील विविध विषयांतील अनेक धडे कमी करण्यात आले आहेत. काही धडय़ांची नावे घेऊन इतर धडय़ांना सोईस्कररीत्या वगळले गेले असून त्यातून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही पोखरियाल यांनी गुरुवारी केला. अभ्यासक्रमातील कपातीवर व झालेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्यासाठी पोखरियाल यांनी ९ ट्वीटची मालिका सादर केली.

अकरावीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून प्रादेशिक वाद, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता तसेच, १२ वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून भारताचे शेजारी देश, १० वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही व विविधता, लिंग, धर्म आणि जात, लोकप्रिय संघर्ष व आंदोलन, लोकशाहीपुढील आव्हाने असे विषय वगळण्यात आले आहेत. अभ्यासक्रमात कपात करताना निवडलेल्या विषयांवरून वाद निर्माण झाला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही अभ्यासक्रमात कपात करताना पारदर्शकता दाखवलेली नाही, अशी टिप्पणी केली.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हे विषय कायमस्वरूपी वगळलेले नसून करोनामुळे फक्त एकदाच करावे लागलेली ही बाब आहे. विद्यार्थ्यांवरील तणाव आणि अभ्यासाचे ओझे कमी करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ राज्यशास्त्राबाबत आक्षेप? : अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र अशा विषयांचे काही धडे वगळण्यात आलेले आहेत. फक्त राज्यशास्त्रातील वगळलेल्या धडय़ांवरून आक्षेप घेतला जात असल्याचा युक्तिवाद पोखरियाल यांनी केला. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे सगळ्यांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे शिक्षणाला राजकारणापासून वेगळे ठेवा आणि आपल्या राजकारणाला अधिक सुशिक्षित बनवा, असे आवाहनही पोखरियाल यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:09 am

Web Title: no politics in education manpower development minister pokhriyals suggestion abn 97
Next Stories
1 अहमद पटेल यांची चौथ्यांदा चौकशी
2 सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत केवळ चार हजार रुपये
3 समूह संसर्ग नाही, फक्त स्थानिक उद्रेक
Just Now!
X