देशात दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.एका कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले की, हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेले नाही व सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे काय या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
धर्मस्थळे व सामुदायिक संवेदनशील स्थळे या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सरकारला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे आम्ही सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. सतर्कतेबाबत माहिती मिळत असते आम्ही ती माहिती राज्य सरकारांना देतो. गणेश चतुर्थी व दुर्गापूजेच्या वेळी अनेक ठिकाणी चकमकी झाल्या होत्या. बकरी ईदच्या वेळी प्राण्यांचे बळी दिले जातात त्यावरून तणाव निर्माण झाले. कालीपूजा व दिवाळीच्या वेळी सतर्कता आवश्यक आहे. काही सार्वजनिक ठिकाणे व धर्मस्थळे येथे अशांतता निर्माण होऊ शकते. पोलीस स्मृतिदिनानिमित्त गृहमंत्र्यांनी  सांगितले की, दिल्लीतील चाणक्यपुरी येथे राष्ट्रीय पोलीस स्मारक उभारण्याचा आमचा विचार आहे त्या दिशेने काम सुरू होईल.