News Flash

काश्मीरमध्ये आयसिसचे अस्तित्व नाही

काश्मीर खोऱ्यात आयसिसचे मनुष्यबळ नाही, अस्तित्व नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

| February 28, 2018 03:05 am

प्रातिनिधिक छायाचित्र

गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण; मात्र पोलीस प्रमुखांचे वेगळे मत

काश्मीर खोऱ्यात आयसिसचे अस्तित्व नसल्याचे स्पष्ट करून केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी याबाबत दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या दाव्याला अवाजवी महत्त्व देऊ नये, असे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. काश्मीर खोऱ्यात आयसिसचे मनुष्यबळ नाही, अस्तित्व नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये रविवारी एका पोलिसाची हत्या केल्याचा दावा आयसिसने केला असला तरी राज्यात आयसिसच्या अस्तित्वाचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.

आयसिसने केलेला दावा ही चिंतेची बाब आहे, त्यामुळे या दाव्याची खातरजमा केली जात आहे, असे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. अमाक आणि अल-करार या आयसिसशी संलग्न प्रचार संघटना असून रविवारी कॉन्स्टेबल फारूक अहमद यांची श्रीनगरमध्ये हत्या केल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. इतकेच नव्हे तर युद्धाला आता सुरुवात झाली आहे, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

अहमद यांची हत्या करून हल्लेखोर त्यांचे सव्‍‌र्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन पसार झाले होते.

आपण काश्मीरमध्ये आलो आहोत असा दावा आयसिसने आपल्या अल-करार या संकेतस्थळावर केला आहे, मात्र याची खातरजमा करणे गरजेचे आहे, ही चिंतेची बाब आहे, असे वैद यांनी म्हटले आहे. पोलीस याबाबत तपास करून दाव्याची खातरजमा करतील, असेही ते म्हणाले. आयसिसने केवळ कॉन्स्टेबलची हत्या केल्याचा दावाच केलेला नाही तर त्यांनी शस्त्रही दाखविले आहे.

तरुणांवर प्रभावाची शक्यता

तथापि, काश्मीरमध्ये आयसिसचे अस्तित्व असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. झाकीर मुसा ज्याप्रमाणे अल-कायदाकडे आकर्षित झाला होता, त्याप्रमाणे समाजमाध्यमांवरील आयसिसच्या प्रचाराने काही जण प्रभावित झाले असण्याची शक्यता आहे, असेही वैद म्हणाले.

काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेल्या हल्ल्यांत आमचा हात असल्याचा दावा यापूर्वी आयसिसने केला होता, आयसिसचे झेंडे खोऱ्यात कधीतरी विशेषत: ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झळकल्याचे दिसून येते.

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

श्रीनगर : बंदिपोरा जिल्ह्य़ांत सोमवारी सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत जखमी झालेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मंगळवारी मरण पावला. सदर दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बंदिपोरातील बोन मोल्लाह गावांत सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. गोळीबार थांबल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली, मात्र एकही मृतदेह मिळाला नाही. त्यानंतर एक दहशतवादी जखमी झाल्याचे कळले तो मंगळवारी सकाळी मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले.

या दहशतवाद्याचा मृतदेह सुपूर्द करण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली, मात्र काही समाजकंटकांनी मृतदेहाचे दफन केले. मृत दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही, तो पाकिस्तानातील असल्याचा संशय आहे.

पूंछ, राजौरीमध्ये पाकिस्तानचा तोफांचा मारा; २ जवान जखमीपीटीआय, जम्मू

पाकिस्तानच्या सैनिकांनी पूंछ आणि राजौरी जिल्हय़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ठाण्यांवर आणि नागरी परिसरावर केलेल्या तोफांच्या माऱ्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या सैनिकांनी मंगळवारी सकाळी पूंछ जिल्ह्य़ातील भीमबेर गली क्षेत्रांत छोटी शस्त्रे, स्वयंचलित शस्त्रे आणि उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.

त्याचप्रमाणे राजौरी जिल्ह्य़ातील तारकुंडी गली, लंबी बारी, खोरिनार, धार आणि पंजगरियन येथेही मंगळवारी सकाळी पाकिस्तानच्या सैनिकांनी तोफांचा हल्ला केला, त्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले, असे राजौरीचे जिल्हाधिकारी शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितले.

खबरदारीचे उपाय म्हणून राजौरी जिल्ह्य़ातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या हल्ल्यात या वर्षी आतापर्यंत १२ सुरक्षारक्षकांसह २१ जण ठार झाले असून ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:05 am

Web Title: no presence of isis in kashmir says home ministry
Next Stories
1 पंतप्रधानांच्या परदेश प्रवासाचा खर्च जाहीर करण्याचा आदेश
2 पुढील शतकात मानव व परग्रहवासीय आमनेसामने शक्य
3 ए. के. प्रधान पंजाब नॅशनल बँकेचे ग्रुप चीफ रिस्क ऑफिसर
Just Now!
X