अभिनेते अमिताभ बच्चन, समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांच्यासह इतरांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल कानपूरमधील स्थानिक प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पाठवला. 
शिवकांत त्रिपाठी यांनी अमरसिह, त्यांची पत्नी पंकजा, अमिताभ बच्चन यांच्याविरोधात फसवणुकीचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा १५ ऑक्टोबर २००९ मध्ये दाखल केला होता. उत्तर प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष असताना अमरसिंह यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केला आणि त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना मदत केल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला होता.
उत्तर प्रदेश सरकारने या आरोपांची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. या प्रकरणात कोणाहीविरुद्ध पुरावे सापडले नसल्याचे स्थानिक प्रशासनाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.