करोना संकटात अनेक नेत्यांकडून काळाबाजार तसंच बेकायदेशीरपणे औषधांचं वाटप केल्याच्या आरोप होत असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हायकोर्टात प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे. आरोप झालेल्या नेत्यांमध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास, आमचे आमदार दिलीप पांडे आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्यासह इतरांचा समावेश होता. पोलिसांकडून या सर्वांची चौकशी करण्यात आल्यानंतर कोर्टात अहवाल सादर करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हे सर्वजण स्वेच्छेने आणि कोणताही भेदभाव न करता मदत करत होते असं सांगितलं आहे.

“आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात औषधांचा काळाबाजार केल्याचा आरोप झालेले हे सर्वजण लोकांना औषधं, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि हॉस्पिटल बेडच्या स्वरुपात वैद्यकीय मदत मिळवून देत होते. यावेळी त्यांनी मदत केलेल्यांकडून एक रुपयाही घेतला नाही, यामुळे त्यांच्यावर होणारा घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. वाटप किंवा मदत ही कोणताही भेदभाव न करता सुरु होती,” अशी माहिती क्राइम ब्रांचने कोर्टाला दिली आहे.

दिल्ली कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्याममध्ये मेडिकल माफिया आणि राजकारण्यांमध्ये संबंध असून अवैधपणे औषधांचं वाटप केलं जात असल्याचा आरोपा करण्यात आला होता. यानंतर क्राइम ब्रांचकडून श्रीनिवास, गंभीर यांच्यासह इतरांची चौकशी करण्यात आली. ४ मे रोजी कोर्टाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळत याचिकाकर्ता दीपक सिंग यांना पोलिसांकडे जाण्यास सांगितलं. कोर्टाने यावेळी पोलिसांना स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचाही आदेश दिला.

दरम्यान प्राथमिक तपास अहवाल सादर करताना पोलिसांनी कोर्टाकडे तपास पूर्ण करण्यासाठी अजून वेळ मागितला. पोलिसांनी सविस्तर तपास करण्यासाठी आणि अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

पोलिसांनी रिपोर्टसोबत श्रीनिवास, गंभीर, पांडे, दिल्ली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार, माजी काँग्रेस आमदार मुकेश खुराना, दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी, काँग्रेस नेते अशोक बघेल आणि माजी खासदार शाहीद सिद्धीकी यांचे नोंदवण्यात आलेले जबाबही सादर केले आहेत.

१४ मे रोजी गौतम गंभीरने जबाब नोंदवताना दिलेल्या माहितीनुसार, “गौतम गंभीर फाऊंडेशनने २२ एप्रिल ते ७ मे दरम्यान करोनाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केला होता. गर्ग रुग्णालयाचे डॉक्टर मनिष यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प सुरु होता. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार, औषधांची खरेदी करत रुग्णांना मोफत वाटण्यात आले. लोकांना शक्य ती मदत आमच्याकडून केली जात असून सध्याच्या संकटात कर्तव्य म्हणून केलं जात आहे”.