जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करण्याचा सध्या कुठलाही विचार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले.

अहिर हे भाजपचे खासदार अश्वनी कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होते. राज्यघटनेचे कलम ३७० रद्द करण्यास सरकार वचनबद्ध आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. हरयाणातील कर्नालचे खासदार असलेल्या अश्वनीकुमार यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया आहे व सध्या हे कलम रद्द करण्याबाबत काय स्थिती आहे अशीही विचारणा केली होती. त्यावर अहिर यांनी सांगितले, की कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा सध्या तरी कोणताही विचार नाही.

कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन भाजपने राजकीय जाहीरनाम्यात दिले होते, पण काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती असल्याने भाजपने आता त्यावर मौन बाळगले आहे. २०१५ मध्ये काश्मीरमध्ये पीडीपी व भाजप यांची युती झाली होती. केंद्राचे काश्मीरमधील दूत दिनेश्वर शर्मा यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अहिर यांनी सांगितले, की शर्मा यांनी शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पाश्र्वभूमीवर सीमाभागात भेट देऊन काही सूचना केल्या आहेत. त्यात तेथील नागरिकांना हलवणे व खंदक तयार करणे यांचा समावेश आहे. या बाबतचा प्रश्न काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे व गौरव गोगोई यांनी विचारला होता. अहिर यांनी सांगितले, की काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, समाजातील सर्व गटांशी हिंसाचार रोखण्याबाबत संवाद सुरू आहे.