लडाखमधील काही भूमी चीनने आपल्या ताब्यात घेतली असल्याचे आरोप हे खोडसाळपणाचे असून सरकारने राष्ट्रीय संरक्षणाशी कोणतीही तडजोड केलेली नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
भारताचा ६४० चौरस किलोमीटर भूभाग चीनने बळकावला असल्याचे सरकारनेच नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले आहे, असा आरोप विरोधी पक्ष भाजप आणि यूपीएचा घटक असलेला समाजवादी पक्ष यांनी केला होता. त्या पाश्र्वभूमीवर, संरक्षणमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मात्र संरक्षणमंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. भाजप खासदारांनी सभागृहात उच्चरवात घोषणाबाजी केली तर समाजवादी पक्षाचे खासदार थेट ‘वेल’मध्ये आले. परिणामी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
अँटनींचा खुलासा
राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष श्याम सरण यांनी लडाखला २ ते ९ ऑगस्ट २०१३ या कालावधीत प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी भारताचा कोणताही भूभाग चीनने बळकावल्याचे निदर्शनास आले नाही किंवा कोणत्याही भारतीय हद्दीतील भूभागावर पाऊल ठेवण्यास त्यांना चीनने मनाईसुद्धा केली नाही. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरण यांच्या अहवालात सीमेवर आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानविषयक अद्ययावतीकरण आणि भूसंपादनासह अनेक बाबींवर भाष्य करण्यात आले आहे.