आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरावाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भारतीय राजकारणात मोठी खळबळ माजवली असून, दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं आज (मंगळवार) केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
दिल्ली विधानसभेत एकाही पक्षाला बहुमत न मिळाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तरीही भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून त्याखालोखाल ‘आप’ला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतू सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा कुणाकडेच नाही. असं असताना भाजपला पाठिंबा देणार नाही हे केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले. प्रशांत भूषण यांनी सोमवारी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
जनलोकपाल विधेयक डिसेंबर महिनाअखेर लागू करण्याची लेखी हमी भाजपने दिल्यास, ‘आप’ त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू शकते, असं प्रशांत भूषण म्हणाले होते. आम आदमी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे, येत्या २९ डिसेंबरच्या आत जनलोकपाल विधेयक संमत करणे आणि ‘जन सभा’ स्थापन करण्याचे लेखी आश्वासन दिल्यास भाजपला पाठिंबा देण्याबाबत विचार करू असे एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला सोमवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत भूषण म्हणाले होते.     
दरम्यान, आपण केलेले वक्तव्य हे जर-तरच्या भाषेमध्ये केले होते, असा खुलासा प्रशांत भूषण यांनी केला आहे.   
जर भाजप हा पक्ष ‘आप’सारखा झाल्यास आणि ‘आप’ची निर्मिती ज्या गोष्टी करण्यासाठी झाली आहे आणि ज्यामध्ये ‘आप’ विश्वास ठेवते, तसे भाजपने केल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू, असं प्रशांत भूषण पत्रकारांशी बोलताना म्हणाले. परंतू हे पक्ष ‘आप’ सारखे कधीच बनू शकणार नाहीत, त्यामुळे हे कधीच शक्य नाही, असंही प्रशांत भूषण पुढे म्हणाले.
तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी देशातील सर्व संस्था, राजकीय शक्ती आणि पक्षांनी आपल्या चुका सुधारून एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी सर्व राजकीय नेत्यांना भ्रष्टाचाराविरोधात खंबीरपणे भूमिका घेण्याचे आणि आपल्या पक्षात सहभागी होण्याचेही आवाहन केले.
आम आदमी पार्टीच्या नवनिर्वाचित आमदारावर पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाच्या आरोपाबबात विचारले असता हे आरोप खोटे असल्याचं केजरीवाल म्हणाले.