हाथरस पीडित तरुणीवर बलात्कार झालेला नसल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी केला. यामुळे देशभर पडसाद उमटत असलेल्या या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हाथरस पीडित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीचा मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे पार्थिव घरी घेऊन जाण्याची कुटुंबीयांची मागणी धुडकावून पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच पोलिसांनी गुरुवारी नवा दावा केला.

‘‘गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे हाथरसच्या पीडितेचा मृत्यू झाल्याचे  शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्ट होते’’, असा दावा अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत बलात्काराचा उल्लेख केलेला नसून, केवळ मारहाण (मारपीट) झाल्याचे सांगितले, असे  प्रशांत कुमार म्हणाले.

सामाजिक सलोखा बिघडविण्याबरोबरच जातीय हिंसाचार घडविण्यासाठी काही जणांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचे प्रशांत कुमार म्हणाले.

हाथरस प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईलच. मात्र, वैद्यकीय अहवाल येण्याआधीच काहींनी सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांबाबत सरकार आणि पोलीस संवेदनशील असल्याचेही प्रशांत कुमार यांनी नमूद केले.

दरम्यान, शुक्राणू आढळले नाही म्हणजे बलात्कार झाला नाही, असा दावा करता येणार नाही, असे नमूद करत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना लक्ष्य केले.

भादंवि कलम ३७५ मध्ये दुरुस्ती आणि उत्तर प्रदेश सरकारविरूध्द बाबूलनाथ या १९९४ च्या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत सुप्रिया यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा खोडून काढला.