भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशमधील वरिष्ठ नेते आणि बलिया मतदारसंघाचे खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. “देशातील लोक जॅकेट आणि कोट घालून फिरत आहेत. त्यामुळेच आर्थिक मंदी आहे असं म्हणता येणार नाही,” असं मत वीरेंद्र यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“दिल्लीत आणि जगभरामध्ये आर्थिक मंदीची चर्चा सुरु आहे. मात्र खरोखर आर्थिक मंदी असती तर आपण आज जॅकेट आणि कोट न घालता कुर्ता आणि धोतर घालून फिरत असतो. आर्थिक मंदी असती तर आपण कपडे, पॅण्ट आणि पायजमे विकत घेतले नसते,” असं मत वीजेंद्र यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये भाषण करताना त्यांनी हे मत मांडले.

वीजेंद्र मस्त यांनी अशाप्रकारे मजेदार वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी वाहनश्रेत्रातील मंदीबद्दल बोलताना, “वाहनश्रेत्रात मंदी असेल तर मग वाहतूककोंडी का होते?”, असा सवाल उपस्थित केला होता. सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून आर्थिक मंदी असल्याचे आरोप केले जात असल्याचंही वीजेंद्र यांनी यावेळी म्हटलं होतं.

अर्थव्यवस्थेची स्थिती काय?

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर ४.५ टक्क्यांपर्यंत मंदावला आहे. २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये असणारा ४.५ टक्के हा मागील सहा वर्षांमधील सर्वात कमी दर आहे. ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा दर ५ टक्क्यांपर्यंत राहील अशी शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

असं वक्तव्य करणारे भाजपाचे पहिलेच नेते नाहीत

भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात अशापद्धतीची व्यक्तव्ये करणारे वीजेंद्र हे काही पहिलेच नेते नाहीत. याआधी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये चित्रपटांच्या कमाईचा संदर्भ देत आर्थिक मंदी नसल्याचे वक्तव्य केलं होतं. “२ ऑक्टोबर रोजी तीन चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट समिक्षक कोमल नाथ यांनी मला २ ऑक्टोबरच्या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी वॉर, जोकर आणि सायी रा या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली. अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये असल्यानेच चित्रपटांना एका दिवसात १२० कोटींची कमाई करता आली,” असा दावा प्रसाद यांनी केला होता.

अर्थमंत्रीच म्हणाल्या होत्या

सप्टेंबर महिन्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही वाहन श्रेत्रातील मंदीसंदर्भात एक अजब व्यक्तव्य केलं होतं. ‘मिनिमल्स म्हणजेच तरुण पिढीतील लोक उबर आणि ओलासारख्या सेवा वापरत असल्याने वाहन श्रेत्रात मंदी आली,’ असं मत सितारामन यांनी व्यक्त केलं होतं.