भारत आणि बांगलादेश यांच्यात जमीनवाटपाची कोणतीही समस्या नसून सीमावादासह अन्य सर्व प्रलंबित मुद्दय़ांचेही निराकरण झाले आहे, असे उभय देशांमधील भूलेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी येथे जाहीर केले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमावादासह विविध मुद्दय़ांचे निराकरण करण्यासाठी भारत बांगलादेशदरम्यान गुरुवारी सुरू झालेली ८२ वी संयुक्त सीमा परिषद शनिवारी समाप्त झाली. पश्चिम बंगाल, त्रिपुरामधील चंदन नगर परिसर, दक्षिण त्रिपुरामधील मुहुरी नदीसंबंधी तंटा आणि सीमेसंबंधी अन्य तंटे संपुष्टात आले आहेत, असे बांगलादेशच्या जमीन दस्तावेज विभागाचे महासंचालक अब्दुल मन्नन आणि भारताच्या पूर्व विभागाच्या भूआखणी विभागाचे संचालक एन. आर. बिस्वाल यांनी रविवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व मुद्दे आता संपुष्टात आले असून त्यावर उभय देशांच्या संसदेचे शिक्कामोर्तब होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.