अमर कॉलनी मार्केट परिसरात वीर्य भरलेला फुगा फोडण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला होता. पण फॉरेन्सिक अहवालातून त्या फुग्यात वीर्य नसल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीमधल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आपल्यावर अमर कॉलनी मार्केट परिसरात वीर्य भरलेला फुगा फोडण्यात आल्याचा आरोप केला होता. होळीच्या आधी तिनं आपल्या इन्स्टाग्रामवरून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला होता. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अत्यंत विकृतीजनक या प्रकराविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. आता दोन महिन्यानंतर तिच्यावर फेकलेल्या फुग्यामध्ये वीर्य नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यानंतर तपासणीसाठी तिचे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. दीड महिन्यानंतर याचा अहवाल समोर आला आहे. तिच्यावर फेकलेल्या फुग्यात वीर्य नव्हतं, असं या अहवालात म्हटलं आहे.

लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळीच्या दरम्यान एक पोस्ट लिहिली होती. ‘ माझ्या दिशेनं फुगा मारण्यात आला. तो माझ्या अंगावर फुटला. पण, यात पाणी नसून काहीतरी वेगळंच असल्यानं मला जबरदस्त धक्का बसला. कारण कोणीतरी वीर्य फुग्यात भरून ते माझ्या दिशेनं फेकलं होतं. माझ्या काळ्या कपड्यांवर ते उठून दिसत.’ असं या मुलीनं इन्स्टाग्राम अकाऊंवर लिहीत घडलेला प्रकार आणि फोटो शेअर केले. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. विद्यार्थिनीसोबत झालेल्या या प्रकारामुळे महिला महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशा विकृती लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर तक्रारदार मुलीचे कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक अहवालानुसार यात वीर्य नसून एखादा पदार्थ आणि पाणी याचं मिश्रण फुग्यात भरलं असल्याचं पोलीस उपायुक्त रोमील बनिया यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पण, हा पदार्थ कोणता होता हे मात्र अद्यापही समजू शकलं नाही.