रेल्वे प्रवाशांना मार्च २०१८ पर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी सेवा कर (सर्व्हिस चार्ज) मधून सूट देण्यात आली आहे. सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटकडे प्रवाशांचा कल वाढावा म्हणून सेवा शुल्कात सूट दिली होती. त्यानंतर ही सुविधा ३ जून आणि पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी २० ते ४० रूपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. रेल्वे मंडळाने आयआरसीटीसाला पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत ही सूट देण्यास सांगितले आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयआरसीटीसीला मिळणारा ३३ टक्के महसूल हा ऑनलाइन बुकिंगवरील सर्व्हिस चार्जमधून येतो.

गेल्या वर्षी आयआरसीटीसीला १५०० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यामध्ये ५४० कोटी रूपये तिकीट बुकिंगमधून मिळाले होते. २३ नोव्हेंबर २०१६ पासून २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत रेल्वेने सर्व्हिस चार्ज आणि सर्व्हिस टॅक्सच्या रूपात तिकीट बुकिंगवर प्रवाशांकडून १८४ कोटी रूपये घेतलेले नाहीत.