भारत आणि रशियामध्ये एस-४०० मिसाइल सिस्टिमचा करार झाला आहे. या करारातंर्गत भारत ४० हजार कोटी रुपये मोजून रशियाकडून पाच एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेणार आहे. इतक्या मोठया रक्कमेचा हा करार असला तरी या कराराच्या सार्वभौमत्वासंबंधी रशियन सरकारने भारताला कोणतीही हमी दिलेली नाही असे हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही.एस.चौधरी यांनी मंगळवारी सांगितले. कराराच्या सार्वभौमत्वाची हमी म्हणजे उद्या करारात काही घोटाळा झाला तर त्याला रशियन सरकार जबाबदार नसेल.

एस-४०० मुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियाबरोबर हा करार केला. ऑक्टोंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आलेले त्यावेळी दोन्ही देशांमध्ये हा करार झाला. २०२० पासून रशियाकडून भारताला एस-४०० सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल. एप्रिल २०२३ मध्ये भारताला शेवटची पाचवी सिस्टिम मिळेल.

एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.