मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार असून राष्ट्रीय जनता दलालाही महाआघाडीत स्थान देण्यात आले आहे. तर काँग्रेससाठी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील महाघाडीत काँग्रेसला मानाचे स्थान न मिळाल्याने राहुल गांधींसाठी हा हादरा मानला जात आहे.

दैनिक जागरण या वृत्तपत्राने उत्तर प्रदेशमध्ये बसपा, सपा आणि राष्ट्रीय जनता दलाने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दिले आहे. या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र देखील ठरले आहे. बसपा ३८, समाजवादी पक्ष ३७ आणि राष्ट्रीय जनता दल ३ जागा लढवणार आहे. तर रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तावर अद्याप बसपा, सपा किंवा काँग्रेस नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. २०१४ मधील निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७३ जागांवर विजय मिळवला होता. तर समाजवादी पक्षाला पाच तर काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळाला होता. मायावती यांच्या बसपाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. मात्र, गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेसाठी तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यात समाजवादी आणि बसपाने एकत्र येत भाजपाला हादरा दिला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मायावती- अखिलेख यादव ही बुआ – भतीज्याची जो़डी कोणाचं नुकसान करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.