स्वयंघोषित गोरक्षक घालत असलेल्या उच्छादाचा मुद्दा देशभरात काही महिन्यांपूर्वी चांगलाच चर्चेत होता. गायींची कत्तल रोखण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी या गोरक्षकांनी अनेकदा गुरांची वाहतूक करणारे ट्रक अडवून चालकांना मारहाण केली होती. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारांमुळे गोरक्षकांची काहीशी दहशतही निर्माण झाली होती. त्यामुळे गुरांची अवैध वाहतूक काहीप्रमाणात कमी झाली होती. मात्र, या सगळ्यामुळे मेरठमध्ये अर्धांगवायू झालेल्या एका गायीवर उपचार होऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. ज्योती ठाकूर या महिलेकडे एक सात वर्षांची गाय आहे. काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूमुळे या गायीच्या शरीराचा काही भाग निकामी झाला होता. त्यामुळे ज्योती यांना त्यांच्या गायीला बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत ( आयव्हीआरआय) उपचारासाठी घेऊन जायचे आहे. मात्र, गोरक्षकांच्या भीतीमुळे एकही ट्रक चालक गायीला बरेलीपर्यंत नेण्यास तयार नाही. उपचारांअभावी गायीच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ज्योती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरूण जेटली , स्मृती इराणी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना मदतीसाठी साकडे घातले होते. ज्योती यांनी ट्विटरवरून या नेत्यांना संदेश पाठवलाय. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत कोणीही प्रतिसाद दिलेला नाही.

सरकारी मदतीने गोरक्षकांचा सुळसुळाट

ज्योती ठाकूर या एमबीए असून त्या सध्या बंगळुरू येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्या मेरठ येथील लाला मोहम्मदपूर या आपल्या मूळगावी मुक्कामाला आहेत. त्यांच्या घरी असणारी मोनी ही गाय २८ ऑक्टोबरला आजारी पडली होती. सुरूवातीला खासगी पशुवैद्यकांनी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर मोनीला स्थानिक पशुवैद्यकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. याशिवाय, येथे एक्स-रे आणि आधुनिक उपचारांची सोय नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी मोनीला भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत नेण्याचा सल्ला दिला. ज्योती यांच्या गावापासून ही संस्था साधारण २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गायीला तिथपर्यंत नेण्यासाठी ट्रकने प्रवास करण्याची गरज आहे. मात्र, गोरक्षकांच्या भीतीमुळे स्थानिक ट्रकचालक गायीला ट्रकमधून नेण्यास तयार नाहीत. त्यांना गोरक्षकांच्या हल्ल्याची भीती वाटते. त्यामुळे ज्योती ठाकूर काहीशा हतबल झाल्या आहेत. कोणीही आम्हाला मदत करायला तयार नाही. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनेही आमच्याकडे पशूंच्या वाहतुकीची सोय नसल्याचे सांगत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे ज्योती ठाकूर यांनी ट्विटवरून नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. मला मदतीची गरज आहे. मी आतापर्यंत तुम्हाला २०० पेक्षा जास्त ट्विटस केली, ईमेल्सही पाठवले. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नाही. मोनी ही गाय असूनही गोमाता नाही का, असा उद्विग्न सवाल ज्योती यांनी विचारला आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गोरक्षेच्या नावाखाली धांगडधिंगा!