नरेंद्र मोदी सरकारविरोधातील विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून त्यावर शुक्रवारी दिवसभर चर्चा होणार आहे. तेलुगु देसम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी मांडलेल्या या प्रस्तावावर सरकार सामोरे जाण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सभागृहात सांगितले. सत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडला गेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती, मात्र सभागृहातील गोंधळामुळे तो चर्चेसाठीच आणला गेला नाही. बहुमत असल्याने भाजप सरकारच्या सत्तेला धोका नसला तरी या प्रस्तावानिमित्त विरोधकांना महत्त्वाच्या गंभीर प्रश्नांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची नामी संधी मिळणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या बैठकीत अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अफवा पसरवून होत असलेला हिंसाचार, रोजगाराचा मुद्दा, भ्रष्टाचार, सहकारी बँकांतील गैरव्यवहार अशा किमान नऊ मुद्दय़ांवर मोदी सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. अविश्वास ठरावासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू केली असून भाजपने पक्षादेश जारी केला आहे. तृणमूल काँग्रेसनेही पक्षादेश जारी करून आपल्या ३४ खासदारांना शुक्रवारी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शून्य प्रहरात हा प्रस्ताव दाखल करून घेतल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी प्रस्ताव दहा दिवसांत चर्चेला आणला जाईल असे सांगितले. मात्र दोनच दिवसांत त्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या ४८ तासांत लोकसभेत चर्चा असल्याने मुदत कमी असून काही खासदार उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चर्चा सोमवारी ठेवली जावी, अशी विनंती काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महाजन यांना केली आहे.

वादळी सुरुवात

लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात गोंधळाने झाली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत तेलुगु देसमच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासाला घोषणाबाजी केली. सपच्या खासदारांनीही उत्तर प्रदेशातील हिंसाचार तसेच अन्य मुद्यांवरून सभापतींच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत नारे दिले. काँग्रेस, सप, तृणमूल काँग्रेस, तेलुगु देसमच्या सदस्यांनी एकाचवेळी मुद्दे उपस्थित करत चर्चेची मागणी केली. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास गोंधळात गेला. सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांशी हस्तांदोलन केले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मोदी यांनी सभागृहात येण्याआधी पत्रकारांना सांगितले.