भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७३वर पोहोचली आहे. दरम्यान, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे जनतेने घाबरुन न जाता दक्षता घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला आहे. तसेच येत्या काळात कोणताही केंद्रीय मंत्री परदेश दौऱ्यावर जाणार नाही. नागरिकांनीही गरज नसल्यास प्रवास करु नये, असेही मोदींनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं की, “जनतेनं घाबरुन जाण्याची गरज नाही. प्रत्येकानं स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्यावी तसेच या विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठी सहकार्य करावं. कोणताही केंद्रीय मंत्री सध्या परदेश दौऱ्यावर जाणार नाही. जनतेनं देखील गरज नसेल तर प्रवास करणं टाळावं. करोनाची ही साखळी तोडण्यासाठी लोकांनी एकत्र येऊ नये.”

“सरकार या समस्येचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रत्येक पातळीवर योग्य ती पावलं उचलली जात आहेत. सर्व मंत्रालयं आणि राज्य सरकारं परस्परांशी समन्वयाद्वारे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या व्हिसाची सुविधा देखील तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.” असंही मोदींनी म्हटलं आहे.