वॉशिंग्टन : काश्मीर प्रश्नी मध्यस्थीचा कुठलाही प्रस्ताव नाही असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले असल्याचे भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले आहे.

त्यांनी सोमवारी असे सांगितले की, अमेरिकेचे काश्मीरबाबतचे अनेक दशकांपासूनचे धोरण कायम असून त्यात बदल झालेला नाही त्यामुळे काश्मीर प्रश्नी अमेरिका मध्यस्थी करणार नाही. भारत व पाकिस्तान यांनी त्यांच्यातील प्रश्न द्विपक्षीय मार्गानेच सोडवावे असेच अमेरिकेचे मत आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेत भेट दिली असता ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नात मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. ओसाका येथील बैठकीत चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याचा मुद्दा मांडला होता त्यामुळे  मोदी यांनी विनंती केली तर मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. पंतप्रधानांनी असा कुठलाही प्रस्ताव ट्रम्प यांच्यापुढे मांडला नव्हता असे भारताने त्यानंतर लगेच स्पष्ट केले होते.

अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या आवडत्या फॉक्स वृत्त वाहिनीला शृंगला यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांनी मान्य केल्याशिवाय काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करणार नाही असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. भारताने मध्यस्थीचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारलेला नाही त्यामुळे आता हा प्रस्ताव विचाराधीन नाही.

मोदी यांनीच काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची विनंती केली होती या मुद्दय़ांवरून नंतर ट्रम्प यांनीही माघार घेऊन भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न द्विपक्षीय मार्गाने सोडवावे असे स्पष्टीकरण केले होते.

काश्मीर प्रश्नी जर चर्चेची गरज वाटली तर पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा केली जाईल. त्यात कुणाचाही हस्तक्षेप किंवा मध्यस्थी असणार नाही हे भारताचे धोरण असल्याचे अमेरिकेला सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. काश्मीर प्रश्न हा त्रयस्थ मध्यस्थीचा नाही तो शिमला करार व लाहोर जाहीरनाम्यानुसार सोडवावा असे संयुक्त राष्ट्र सरचिटणिसांनीही स्पष्ट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मॉर्गन ओरटॅगस यांनी काश्मीर प्रश्नी धोरणात अमेरिकेने बदल केला नसल्याचे स्पष्ट केले होते.

काश्मीरमध्ये जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते तात्पुरते असल्याचे सांगून ते म्हणाले की, कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या स्थितीत सीमेवर घुसखोरी व दहशतवादी कारवायांची शक्यता होती. त्यातून हिंसाचार होऊ शकला असता म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत ते तात्पुरते आहेत. हजारो लोकांनी ईद उत्साहात साजरी केली आहे. लोकांनी मशिदीत जाऊन नमाजही अदा केला.

 

दक्षिण आशियातील दोन महत्त्वाचे देश असलेल्या भारत व पाकिस्तान या शेजारी देशात मध्यस्थी करायची नाही उलट त्यांनी द्विपक्षीय मार्गाने प्रश्न सोडवण्यास उत्तेजन द्यायचे ही काश्मीरबाबत अमेरिकेची भूमिका कायम आहे. काश्मीर प्रश्नी जर चर्चेची गरज वाटली तर पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा केली जाईल.

– हर्षवर्धन शृंखला, भारताचे अमेरिकेतील राजदूत