News Flash

देशाला सरकारवर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची गरज -अभिजीत बॅनर्जी

जयपूर फेस्टिवलमध्ये व्यक्त केलं मत

नोबेल पुरस्कारानं सन्मानित अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारतातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. “लोकशाहीचं ह्रदय असलेल्या आणि सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची भारताला गरज आहे. सत्ताधारी पक्षानेही हे बघितले पाहिजे,” असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. जयपूर येथे सुरू असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना अर्थतज्ज्ञ बॅनर्जी यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केली. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना बॅनर्जी म्हणाले,”अर्थव्यवस्थेच्या समस्येतून भारत लवकर बाहेर पडेल असं वाटत नाही. त्यासाठी दीर्घळाळ लागेल. अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल इतका पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्येही पैसा लावू शकू अशी आपली परिस्थिती नाही. पण, अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे,” असं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले बॅनर्जी-

गरिबी ही कॅन्सरसारखीच असते. कॅन्सरमुळे जशा विविध व्याधी जडतात, तसंच गरिबीचं असतं. काही लोकांकडे शैक्षिणक दारिद्र्य असतं. काही लोकांकडे आरोग्याचं, तर काही लोकाकडे संपत्तीचं दारिद्र्य असतं. त्यामुळे आपण काय गमावलं हे आपणच शोधलं पाहिजे. कठोर परिश्रम करून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे.

देशातील नागरिकांनी धर्म आणि जातीच्या आधारे मतदान करू नये. आम्ही उत्तर प्रदेशात एक मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचं आवाहन केलं. विकास आणि इतर दैनंदिन मुद्दे लक्षात घेऊन लोकांनी मतदान करावं हा या मोहिमेमागचा उद्देश होता.

मुलांना प्रत्येक विषय समजत नसतो. त्यांना ज्या विषयात रुची आहे, तोच विषय त्यांना समजतो. त्यामुळे त्यांना जे समजतं तेच शिकवलं पाहिजे. चौथीच्या मुलांना समाजशास्त्र शिकवून चालणार नाही. कारण समाजशास्त्रासाठी वाचन खूप करावं लागतं. त्यामुळे मुलांचा वाचनात रसच नसेल तर माहिती नसलेल्या भाषेतील सिनेमा पाहताना जी अवस्था होते, तिच या मुलांची होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 7:48 pm

Web Title: nobel laureate abhijit banerjee says india need strong oppostion bmh 90
Next Stories
1 Mann ki Baat : हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नाही -पंतप्रधान मोदी
2 धार्मिक भेदभावाशिवाय ‘त्यांनी’ ५५०० बेवारस मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार; ‘पद्मश्री’नं झाला गौरव
3 २५० भारतीय विद्यार्थी अडकले मृत्यूच्या दाढेत, चीनमधील ‘कोरोना व्हायरस’च्या शहरातून बाहेर पडता येईना
Just Now!
X