पोलंडच्या लेखिका ओल्गा तोकार्झूक यांना २०१८ सालचा तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडके यांना २०१९ चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी या पुरस्काराला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे २०१८चा पुरस्कार या वर्षी जाहीर करण्यात आला आहे.

५७ वर्षीय ओल्गा या पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी व्यक्ती आहेत. त्या आपल्या पिढीतील व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी लेखकांपैकी एक आहेत. २०१८मध्ये त्यांना ‘फ्लाईट्स’ या आपल्या कांदबरीसाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले होते. हा गौरव प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत.

तर ऑस्ट्रिअन कादंबरीकार आणि अनुवादक पीटर हँडके (वय ७६) यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले होते. पीटर यांनी चित्रपटांसाठी लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाला १९७८ मध्ये कान फेस्टिवलमध्ये १९८० मध्ये गोल्ड अॅवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. तसेच १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून ते नावारुपाला आले होते.

१९०१ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली होती. आजवर ११६ साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यात सर्वाधिक इंग्रजी भाषिक साहित्यिकांचा समावेश आहे. चार वेळा संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. साहित्यातील नोबेल सर्वात कमी वयात जिंकण्याचा मान ‘द जंगल बुक’ हे पुस्तक लिहिणाऱ्या रुडयार्ड किपलिंग यांच्या नावावर आहे, त्यावेळी त्यांचे वय ४१ वर्षे होते. त्यांचा जन्म ब्रिटिशशासित मुंबईमध्ये झाला होता.