जपानचे काजिता, तर कॅनडाचे मॅकडोनल्ड मानकरी
न्यूट्रिनो कणांविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या संशोधनासाठी जपानचे ताकाकी काजिता व कॅनडाचे आर्थर मॅकडोनल्ड यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. न्यूट्रिनो कणांचे गुणधर्म रंग बदलणाऱ्या शॉमेलिऑन सरडय़ासारखे बदलत असतात व त्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते, असे या अभ्यासकांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले.
काजिता (वय ५६) हे टोकियो विद्यापीठात प्राध्यापक असून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मिक रे रीसर्च’ या संस्थेचे संचालक आहेत. मॅकडोनल्ड (७२) हे कॅनडातील किंगस्टन येथील क्वीन्स विद्यापीठाचे मानद प्राध्यापक आहेत. विजेत्यांना ८० लाख क्रोनर म्हणजे ९ लाख ६० हजार अमेरिकी डॉलर्स विभागून मिळणार आहेत. १० डिसेंबरला पुरस्कार वितरण होणार आहे.
काजिता व मॅकडोनल्ड यांनी अनुक्रमे सुपर कामियोकँडे डिटेक्टर (जपान) व सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी (कॅनडा) येथे संशोधन केले आहे. १९९८ मध्ये काजिता यांनी न्यूट्रिनो कण पकडले होते व वातावरणामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला होता. मॅकडोनल्ड यांनी सांगितले की, माझ्या प्रयोगाला मान्यता मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. या शोधाला नोबेल मिळाल्याने काम संपलेले नाही, तर वैज्ञानिकांनी न्यूट्रिनोचे वस्तुमान तपासले पाहिजे. टोकियो विद्यापीठाने काजिता यांचे अभिनंदन केले असून ते २००२ मधील नोबेल विजेते मासतोशी कोशिबा यांचे विद्यार्थी आहेत. कोशिबा यांचे संशोधनही न्यूट्रिनोवरच आहे.

दोघा संशोधकांनी न्यूट्रिनो कणांचे नवीन गुणधर्म शोधले असून ते विश्वात जवळपास प्रकाशाच्या वेगाने प्रवेश करीत असताना गुणधर्म व रूप बदलत असतात. न्यूट्रिनो हे असे सूक्ष्म कण असतात जे आण्विक अभिक्रियांमध्ये तयार होतात. सूर्य, इतर तारे तसेच अणू प्रकल्पात या अणू अभिक्रिया होत असतात. न्यूट्रिनोंचे एकूण तीन प्रकारही आहेत. न्यूट्रिनो हे कण वस्तुमानरहित असल्याचा आधीचा समज असला तरी हे कण दोलनामुळे त्यांचे प्रकारच सतत बदलत असतात. तसेच न्यूट्रिनोचे वर्तन सतत सरडय़ाच्या रंगाप्रमाणे बदलत असते. द्रव्यातील अंतर्गत स्वरूप व विश्वाचे ज्ञानाबाबत हे संशोधन उपयोगी पडणार आहे.