जर्मनीतील नाझी राजवटीदरम्यान तरुणाईची भूमिका ठामपणे मांडणारे नोबेल पारितोषिकविजेते लेखक गुंटर ग्रास यांचे सोमवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. स्टायडल पब्लिशिंग हाऊसचे प्रवक्ते मथायस वेग्नर यांनी त्यांचे ल्युबेक रुग्णालयात सोमवारी सकाळी निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
ग्रास यांनी शिल्पकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जर्मन साहित्याचे पुनरुज्जीवन घडवण्यात तसेच लोकशाही प्रक्रिया रुजवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचे ‘द टिन ड्रम’ हे पहिले पुस्तक १९५९ साली प्रकाशित झाले. त्यानंतर त्याचे ‘कॅट अँड माऊस’ आणि ‘डॉग इयर्स’ हे पुढील भाग आले. त्यात त्यांनी सध्या पोलंडमध्ये असलेल्या डँझिंग या पूर्वीच्या जर्मन शहरात घालवलेल्या बालपणीच्या काळातील अनेक आठवणी नमूद केल्या आहेत. या योगदानाबद्दल १९९९ साली त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
त्यांचे ‘स्किनिंग द ओनियन’ हे आत्मचरित्र २००६ साली प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी तरुणपणी अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या वाफेन-एसएस नावाच्या दमनकारी संघटनेत भाग घेतल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. ‘व्हॉट मस्ट बी सेड’ या २०१२ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात त्यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाला टोकाचा विरोध करणाऱ्या इस्रायलच्या अण्वस्त्रांकडे मात्र डोळेझाक करणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्या दुटप्पीपणावर टीका केली. तसेच अण्वस्त्रधारी इस्रायल हा जागतिक शांततेला मोठा धोका असल्याचे म्हटले. त्यामुळे इस्रायलचा रोष ओढवून घेतला.

वादग्रस्त तरीही लोकप्रिय
जर्मनीचे प्रख्यात कादंबरीकार, सामाजिक भाष्यकार व नोबेल विजेते गुंटर ग्रास यांनी गोथ इन्स्टिटय़ूटमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. भारत व जर्मनी या दोन देशांमधील सांस्कृतिक आदानप्रदानात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती, ते अतिशय स्पष्टवक्ते होते. चाकोरीबद्ध शिस्त न पाळणे हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ होते. वादविवादात त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हते. त्यांनी त्यांच्या लेखनातून अनेक देशांवर त्यांची मुद्रा उमटवली होती, प्रत्येक वेळी सभागृहातील लोकांवर गारुड करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कुणाचेही लक्ष वेधून घेणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
मी गुंटर ग्रास यांना तीन महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले होते. इ.स. २००० मध्ये त्यांना व्हिलिनियस येथे निमंत्रित केले. ती चार नोबेल विजेत्यांची शिखर बैठक होती, असे म्हणायला हरकत नाही. त्यात झेस्लॉ मिलोझ, विस्लाव झीमबोरस्का व टॉमस व्हेनक्लोवा यांचा समावेश होता, बरोबरीला गुंथर ग्रास होतेच. त्यावेळी ‘फ्युचर ऑफ रिमेब्रन्सेस’ हा विषय चर्चेसाठी ठेवला होता. त्यात ‘आय रिमेम्बर’ हे नितांत सुंदर भाषण गुंटर ग्रास यांनी केले होते. त्यांनी प्रथमच त्या भाषणात दुसऱ्या महायुद्धातील निर्वासितांच्या सामूहिक भवितव्यावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी ‘क्रॅबवॉक’ या पुस्तकात त्यांचे हे भाषण नंतर समाविष्ट केले होते. गुंटर ग्रास यांच्यासाठी पूर्व जर्मनीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, तेथील डॅनझिग या गावात त्यांचा जन्म झाला व तेथेच त्यांचा ऐंशीवा वाढदिवस २००७ मध्ये साजरा झाला होता. वॉरशाव येथील गोथ इन्स्टिटय़ूटने त्यांना परिसंवादासाठी बोलावले होते, त्यावेळी लेक वॉलेसा, रीचर्ड व्हॉन वेझ्ॉकर हे दिग्गज उपस्थित होते. त्यावेळी जे संभाषण झाले ते फार महत्त्वाचे व आशयघन होते. वर्षभरापूर्वीच गुंटर ग्रास यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अशी कबुली दिली होती की, ते व्ॉफेन-एसएस या जर्मनीतील लष्करी आघाडीचे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सदस्य होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमातून मोठय़ा प्रमाणात राग व्यक्त झाला होता. ग्रास हे जर्मनीच्या नैतिक सद्सद्विवेकाचे प्रतीक होते. ते आक्रमक कवी, आंदोलक होते पण त्यांनी अनेक दशके व्ॉफेन-एसएस या आघाडीचे आपण सदस्य होतो हे लपवून ठेवले हे अनेकांना आवडले नाही. वॉलेसा यांनी त्यांना डँझिंग शहराने दिलेले मानद नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. डँझिंग येथील बैठकीत ग्रास यांचे तुष्टीकरण करण्यात आले असे त्यांचे म्हणणे होते. जर्मनीतील कुठल्याही विचारवंताने पोलंडबरोबर समेटाशी गुंटर ग्रास यांच्याइतकी वचनबद्धता दाखवली नव्हती. रीचर्ड फॉन वेझ्ॉकर हे त्यांच्याच रांगेत बसलेले राजकारणीही त्याच मताचे होते. ग्रास यांनी मला लिथुआनियामध्ये एकदा सांगितले होते की, पश्चिम जर्मनीत असणे सुंदर आहे पण पूर्व जर्मनीत असणे जास्त सुंदर आहे. तेव्हा आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यानंतर आम्ही पुन्हा जानेवारी २००५ मध्ये भेटलो त्यांना आम्ही कोलकात्यात बोलावले होते. त्यांनी दोन आठवडे या महानगरात वास्तव्य केले. त्यांची ती भेट ही एखाद्या महापालिकेच्या नेत्याची पोलीस संरक्षणातील भेट असते तशीच होती. त्यानंतर अनेक दशके त्यांनी कोलकात्याशी ऋणानुबंध कायम राखले. जर्मनी व आंतरराष्ट्रीय पातळीवर ते वादग्रस्त ठरले तरी त्यांच्याविषयी आदरभावनाही होती. ग्रास यांनी  काही प्रमाणात ध्रुवीकरणाची भूमिका पार पाडली तरी त्यांनी जर्मनीच्या राजकीय संस्कृतीचे उन्नयन केले. त्यांनी ज्या ठिकाणांना भेटी दिल्या त्यात स्वारस्य दाखवले. कोलकाता येथील कथित बुद्धिमंत फॅसिस्ट प्रवृत्तीच्या हुकूमशहाची भलामण करतात व  नेताजी सुभाषचंद्र बोस हेच त्यांना सर्वोच्च नेते वाटतात याविषयी त्यांनी उघड नापसंती व्यक्त केली होती.
ग्रास हे निश्चितच एक मोठे लेखक व विचारवंत होते. भारतात सांस्कृतिक आदानप्रदानातही त्यांचा मोठा वाटा होता. प्रत्येकाला त्यांची  ओळख होती, पश्चिम बंगालमध्ये ती अधिकच निर्माण झाली. कोलकाता शहरातून भटकताना रिक्षावालेही त्यांना ‘ओ मिस्टर ग्रास’ म्हणून हाक मारायचे तेव्हा त्यांची ही थोरवी पटायची.
मार्टिन वाल्दे