पीटीआय, लंडन

नोबेल विजेते साहित्यिक

वसाहतवाद, धर्म, राजकारण अशा अनेक विषयांवर, नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या तिरकस शैलीत बोचरे पण नेमके टीकात्मक भाष्य करणारे नोबेल विजेते लेखक विद्याधर सूरजप्रसाद तथा व्ही. एस. (विदिआ) नायपॉल  (८५) यांचे निधन झाल्याचे येथे शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले.

‘वसाहतींमध्ये जन्मलेला अनवाणी मुशाफीर’ असा स्वत:चा उल्लेख करणाऱ्या या साहित्यिकाची जीवनयात्रा लौकिकार्थाने थांबली असली, तरी बेगडी संवेदनशीलता आणि लोकप्रियतेचा सोस यांच्यापासून लेखकाने फटकूनच राहिले पाहिजे, हा त्यांच्या साहित्यकृतींमधून प्रसृत होणारा संदेश कालातीत ठरतो.

नायपॉल यांचे बहुतांश आयुष्य हे इंग्लंडमध्ये गेले. नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे भारतीय हिंदू कुटुंबात झाला. अठराव्या वर्षी इंग्लंडला जाण्यापूर्वीचे त्यांचे आयुष्य दारिद्रय़ातच गेले. ऑक्स्फर्डमधील युनिव्हर्सिटी कॉलेजची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. त्या विद्यापीठात असतानाच त्यांनी पहिली कादंबरी लिहिली पण ती प्रकाशित झाली नव्हती. नंतरच्या काळात ते नैराश्यात गेले व आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थी दशेत त्यांना संघर्ष करावा लागला. नायपॉल यांनी एकूण ३० पुस्तके लिहिली. त्यात कादंबऱ्या व इतर लेखनाचा समावेश होता. धर्म व राजकारणाचे ते टीकाकार मानले जातात. ‘दि मिस्टिक मॅस्यूर’ हे त्यांचे  पुस्तक १९५१ मध्ये प्रसिद्ध झाले.

ललितेतर लेखनात विपर्यास असू शकतो. सत्यघटकांची फेरमांडणी होऊ शकते. पण ललित लेखन कधीच खोटे नसते! – व्ही. एस. नायपॉल