पैशाचं पाकीट आणि मोबाईल फोन घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. नोएडा सेक्टर ३ परिसरातील गरही चौखांडी गावाजवळ बुधवारी रात्री हा प्रकार घडला. महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचं पाकीट आणि मोबाईल घेऊन पसार झालेले चोरटे एटीएमचा पिन विचारायला परत आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

“जेवणासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही चोरट्यांनी त्याच्याकडचं पैशाचं पाकीट आणि मोबाईल फोन चोरला. पैशाच्या पाकीटामध्ये काही रोखरक्कम, ड्रायव्हर लायसन्स, आधार कार्ड आणि एटीएम कार्ड होतं. काही अंतर पार केल्यानंतर दोन्ही चोरटे एटीएमचा पिन विचारण्यासाठी परत त्या व्यक्तीकडे आले. एटीएमचा पिन मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर या चोरट्यांनी पुन्हा घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी पीडित व्यक्तीने हिंमत करुन पोलिसांना याबद्दल माहिती दिली. या प्रकाराबद्दल माहिती समजताच चेक पॉईंटवर माहिती देण्यात आली. एका पॉईंटवर पोलिसांनी या दोन्ही चोरांना थांबण्याचं आवाहन केलं असता त्यांनी आपल्याजवळी बंदुकीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या पथकानेही गोळीबार करत चोरट्यांचा पाटलाग केला. या झटापटीत जखमी झालेल्या दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे.” नोएडा पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

गौरव सिंह आणि सदानंद अशी या आरोपींची नाव असून ते २५ वर्षांचे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पैशांचं पाकीट, मोबाईल फोन, ३२०० रुपये रोखरक्कम, एटीएम कार्ड व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच दोन्ही आरोपींकडे असलेली देशी बनावटीची पिस्तुल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.