४५ वर्षीय टॅक्सीचालकाची दोन अज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. या घटनेत मृत पावलेल्या टॅक्सीचालकाचं नाव अफताब असं असून तो बुलंदशहरवरुन दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होता. यावेळी वाटेत दोन अज्ञात इसमांनी अफताबची टॅक्सी थांबवली. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी टॅक्सी चोरण्याच्या उद्देशाने अफताबला थांबवलं होतं. यानंतर झालेल्या झटापटीत त्याची हत्या करण्यात आली. दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात बदालपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मात्र अफताबच्या मुलाने याप्रकरणी वेगळी माहिती दिली आहे. ही घटना घडली त्यावेळी अफताब आपल्या मुलाशी बोलत होता. आपल्या वडिलांसोबत काहीतरी वेगळं घडतंय हा संशय आल्यामुळे त्याने तो कॉल रेकॉर्ड केला. ज्यात दोन्ही आरोपी आपल्या वडिलांना जय श्रीराम चे नारे देण्यासाठी भाग पाडत होते. “सोमवारी रात्री आम्हाला या घटनेबद्दल माहिती मिळाली. रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आम्हाला स्विफ्ट डिझायर ही गाडी सापडली. या गाडीत चालक हा जखमी अवस्थेत पडला होता…त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. याप्रकरणी एक ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात आरोपी कोणालातरी जय श्रीरामचे नारे द्यायला सांगत आहेत. पण ते चालकाला नारे द्यायला सांगत आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे”, अशी माहिती नोएडा झोन २ चे एसीबी राजीव कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
अफताबचा २२ वर्षीय मुलगा सरीबने आपल्या वडिलांना जय श्रीराम चे नारे देण्यासाठी भाग पाडल्याचं म्हटलं आहे. यासाठी त्याने आपल्याजवळीर रेकॉर्डींगही पोलिसांना दाखवलं आहे. दरम्यान पोलीसांनी याप्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी याआधीही अशाच पद्धतीने गुन्हे केल्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 1:47 pm