उत्तर प्रदेशमधील नोएडामधील एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आपली जुनी गाडी ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून विकून बनावट चावीच्या मदतीनेच तीच गाडी चोरी केल्याचा आरोप या तरुणावर आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मनोत्तम त्यागी असं असून तो आमरोहचा रहिवाशी आहे. त्यागीने आपल्या गाडीमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली आहे. यापूर्वीही त्यागीने अशाप्रकारे गाडी इतरांना विकून नंतर तीच गाडी चोरण्याचा प्रकार एक दोन नाही तर किमान सात वेळा केला आहे. मागील दोन वर्षांपासून त्यागी या मोडस ऑपरेंडीनुसार काम करत असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. सेक्टर २४ पोलीस स्थानकाचे स्थानक अधिकारी असणाऱ्या प्रभात दिक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी जितेन यादव नावाच्या व्यक्तीने त्याची गाडी चोरीला गेल्याची तक्रार केली होती. यादव यांनी एका वेबसाईटच्या माध्यमातून जुनी गाडी विकत घेतल्याचेही माहितीही पोलिसांना दिली.

“गाडी विकणाऱ्याला मी फोन करुन मारुती स्विफ्ट घेण्यासंदर्भातील किंमत दोन लाख ६० हजार रुपये निश्चित केली. मामुरा सेक्टर ६६ मध्ये मला गाडीची चावी देण्यात आली. मात्र गाडीचे मूळ कागपत्र आणि एक बनावट चावी नंतर देतो असं मला सांगण्यात आलं,” असं यादव यांनी तक्रारीमध्ये म्हटल्याचं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

गाडीचे कागपत्र आणि दुसरी चावी नंतर देतो असं गाडी विकणाऱ्या व्यक्तीने यादव यांना सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. यादव यांनी त्यागीला दोन लाख १० हजार रुपये दिले आणि उरलेले ५० हजार रुपये ते मूळ कागदपत्र आणि दुसरी किल्ली मिळाल्यावर देणार होता. दुसऱ्या दिवशी यादव यांनी सेक्टर १२ मधील आपल्या ऑफिसबाहेर गाडी उभी केली असता ती चोरीला गेली.

यादव यांनी तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळामध्ये चोरीला गेलेली गाडी ग्रेटर नोएडाजवळ दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्या ठिकाणी गाडी दिसली तिथे पोलीस गेले आणि त्यांनी संक्षयित आरोपीला तपासणीसाठी बोलवले. त्यावेळी पोलिसांना गाडीची नंबर प्लेट खोटी असल्याचे दिसून आले. तसेच ही गाडी आपण चोरल्याची कबुली आरोपीन ेदिली.

तपासादरम्यान त्यागीने गाडीमध्ये जीपीएस लावल्याची कबुली दिली. मी गाडीत जीपीएस लावले असून यादव यांना गाडी विकल्यानंतर दुसऱ्या चावीच्या मदतीने मीच ती चोरली असं त्यागीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी चोरीला गेलेली गाडी, दोन मोबाईल फोन, तीन बनावट आधार कार्ड, तीन पॅन कार्ड आणि १० हजार ७२० रुपयांची रोख रक्कम त्यागीकडून ताब्यात घेतली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.