उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या पीडितेच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी यांनी शनिवारी भेट घेतली. मात्र, या भेटी आधी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. यावेळी लाठीमार करण्यात आला. यात एका पोलिसाने प्रियंका गांधींशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं. हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता. अखेर या गैरवर्तनाप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली आहे.

राहुल गांधी व प्रियंका गांधी हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास जात होते. यावेळी त्यांना नोएडातील डीएनडी पुलावर रोखण्यात आलं होतं. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन केल्याचं एक छायाचित्र समोर आलं. ते व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली होती. “कायद्याचे जानकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. पोलिसांच्या कार्यपद्धती मार्गदर्शिकेनुसार, कोणत्याही पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्याही महिलेला सार्वजनिकरित्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श करता येत नाही. प्रियांका गांधी यांच्यासोबत घडलेली घटना कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या योग्य आहे का? त्या पोलिसाला शिक्षा होईल का?,” असा सवाल नितीन राऊत ट्विटद्वारे उत्तर प्रदेश पोलिसांना केला होता.

आणखी वाचा- “किसी का दर्द मिल सके तो ले उधार,…”; थरूर यांचा भाजपाला उपहासात्मक टोला

त्याची दखल घेत नोएडा पोलिसांनी खुलासा केला. “डीएनडी उड्डाणपुलावर प्रचंड गर्दीला नियंत्रित करताना प्रियंका गांधींसोबत घडलेल्या घटनेबद्दल नोएडा पोलीस खेद व्यक्त करत आहेत. पोलीस उपायुक्त कार्यालयाने याची स्वत:हून दखल घेतली आहे. एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर निश्चितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे, नोएडा पोलीस कटिबद्ध आहेत” असं नोएडा पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत यूपी सरकार गप्प का? – मायावती

प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांकडून झालेल्या या गैरवर्तणुकीचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. पोलिसांकडून झालेल्या या गैरवर्तणुकीवरून प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेश पोलिसांवर राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनींही टीका केली होती.