नोकियानं मागील आठवड्यात तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे असलेल्या आपल्या प्रकल्पातील काम तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं दिसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नोकियानं आपल्या कंपनीतील किती कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे हे स्पष्ट केलं नाही. तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मनी कंट्रोलनं रॉयटर्सच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी कंपनीनं आपल्या प्रकल्पामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझेशनही सुरू केलं आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वीच या सर्व बाबींची खबरदारी घेऊन मर्यादित कामगारांच्या मदतीनं उत्पादनाला सुरूवात केली होती.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करत उद्योग सुरू करण्याची परवानगी सरकारनं दिली होती. काही दिवसांपूर्वी मोबाईलचं उत्पादन करणारी कंपनी ओप्पोनंदेखील दिल्लीच्या बाहेरील परिसरात असलेला आपला प्रकल्प तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंच हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.