बिहारमधील जनतेबद्दल द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीमुळे दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे प्रवक्ते शिरीष पारकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी केली आहेत.
न्यायालयात गैरहजर राहण्याची सवलत द्यावी यासाठी राज ठाकरे आणि पारकर यांनी केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी देवेंद्रकुमार शर्मा यांनी अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले असल्याने २४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यातही राज ठाकरे यांची याचिका फेटाळली होती. आपल्याला वाय-दर्जाची सुरक्षा असल्याने न्यायालयात गैरहजर राहण्याची सवलत द्यावी, असे राज ठाकरे यांनी याचिकेत म्हटले होते. तथापि, त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली असल्याने त्यांना न्यायालयात हजर राहावेच लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.