गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने उत्तर भारत कमालीचा गारठला असतानाच गुरुवारी तापमानात अचानक काहीशी वाढ झाल्यामुळे उत्तरेकडील राज्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काश्मीर खोऱ्यात तसेच हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागात अधूनमधून बर्फवृष्टी गुरुवारीही सुरूच राहिली.
राजधानी दिल्लीत गुरुवारी आकाश ढगाळलेले होते. तसेच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली. त्यामुळे दिल्लीकरांना गारठय़ापासून काहीसा दिलासा मिळाला. गुरुवारी दिल्लीतील रात्रीचे तापमान ६.५ अंश सेल्सियस नोंदले गेले, तर बुधवारी ४.४ अंश सेल्सियसची नोंद झाली होती. दिवसभराचे तापमान १८ अंश सेल्सियसपर्यंत नोंदले गेले.याशिवाय पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील तापमानातही काहीशी वाढ झाली. तसेच धुक्यापासूनही वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे गेले काही दिवस काश्मीर खोऱ्याचे देशाच्या इतर भागाशी संपर्क तुटला होता. गुरुवारीही अधूनमधून बर्फ पडत असल्यामुळे तापमान गारठलेलेच राहिले. श्रीनगरमधील तापमान उणे १.९ अंश सेल्सियस इतके नोंदले गेले. गुलमर्ग तसेच अनेक भागांत दीड फुटापर्यंत बर्फ साचला होता.