उत्तर भारताला मुसळधार पावसाने झोडपले असून पंजाब, हरयाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश येथे सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी केला असून पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपातकालीन नियंत्रण कक्ष सूरू करण्यात आले असून सैन्याची तुकडीही मदतकार्यासाठी सज्ज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. पंजाबमध्ये जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ३९१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४९० इतके होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. मात्र, शनिवारी पंजाबला पावसाने झोडपले आणि या पावसामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची नोंद थेट ४४२ मिमीवर पोहोचली. मात्र, महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्याने त्यांना या पावसाचा फटका बसला. सोमवारी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरयाणा व हिमाचल प्रदेशमध्ये आज (सोमवारी) आणि मंगळवारी मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या भागातील मदत कार्यासाठी सज्ज राहावे, असे आदेश सैन्याला देण्यात आले आहे.

सोमवारी हिमाचल प्रदेशमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कांगडा, मंडी आणि चंबा या भागातील पुराचा धोका असलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चंदीगडमधील सुखना लेकने धोक्याची पातळी ओलांडली असून १० वर्षांत पहिल्यांदाच तलावाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कांगडा जिल्ह्यात एक जण पाण्यात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. भाकरा आणि पोंग धरणातील पाण्याने अद्याप धोक्याची पातळी गाठलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North india rains updates punjab himachal pradesh haryana met department alert ravi river
First published on: 24-09-2018 at 13:49 IST