बीफवरुन जर्मनीतल्या फ्रँकफ्रंटमध्ये उत्तर भारतीय आणि केरळी आमनेसामने आल्याची घटना घडली. ही बाचाबाची एवढी झाली की यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ‘इंडियन कौन्सिलेट ऑफ जर्मनी’तर्फे एक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. या खाद्य महोत्सवात काही उत्तर भारतीयांनी केरळी समाजाच्या माणसांनी खाद्य महोत्सवात बीफचा समावेश केल्याचा मुद्दा पुढे करत आंदोलन केलं. त्याचवेळी उत्तर भारतीय आणि केरळी बांधवांमधला वाद उफाळून आला.

खाद्य महोत्सवात जी खाद्य पदार्थांची यादी होती त्यामध्ये परोठा आणि बीफ यांचा पर्याय देण्यात आला होता. त्याचमुळे हा वाद उफाळून आला. यानंतर उत्तर भारतीय समाजाच्या लोकांनी आंदोलन करत खाद्य महोत्सवात जे काही बीफ स्टॉल आहेत ते तातडीने बंद करा अशी मागणी केली. त्यानंतर केरळी समाजाच्या बांधवांनी हे सगळं प्रकरण पोलिसांना सांगितलं. जर्मन पोलीस या खाद्य महोत्सवात हजर झाले आणि म्हटले की, “हा भारत नाही इथे वाद घालू नका.” केरळ कौमुदी ऑनलाईनने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या सगळ्या प्रकारानंतर जर्मनीतल्या मल्याळी लोकांनी उत्तर भारतीयांवर टीका केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुनही या घटनेचा निषेध नोंदवत उत्तर भारतीयांवर निशाणा साधला आहे. आम्ही काय खायचं हे इतर लोक ठरवू शकत नाहीत असं म्हणत मल्याळी समाजातल्या अनेकांनी उत्तर भारतीयांवर निशाणा साधला आहे.