‘उत्तर कोरियाची समस्या सोडविण्यासाठी चीनने साह्य़ केले, तर ते उत्तमच. पण जर नाही केले, तर अमेरिका त्यांच्याशिवाय ती समस्या सोडवील.’ हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, कोरियन उपद्विपात गेल्या आठवडय़ात पाठविण्यात आलेली ‘यूएसएस कार्ल व्हिन्सन’ ही अमेरिकी युद्धनौका, उत्तर कोरियाला अमेरिकेची ‘तयारी’ दाखविण्यासाठी अफगाणिस्तानात करण्यात आलेला महाबॉम्बहल्ला आणि अमेरिकेने खोडी काढल्यास त्याला अणुबॉम्बहल्ल्याने प्रत्युत्तर देण्याचा उत्तर कोरियाचा इशारा या मुळे कोरियन उपद्विपावर युद्धाचे काळे ढग दाटून आल्याचे चित्र आहे.

उत्तर कोरियाचे संस्थापक अध्यक्ष किम इल सुंग यांच्या १०५व्या जयंतीनिमित्ताने शनिवारी प्याँगयाँगमध्ये भव्य लष्करी संचलन करण्यात आले. त्यात विविध शस्त्रास्त्रांचे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. पण या संचलनाचे वैशिष्टय़ म्हणजे यावेळी त्यात दोन नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा, तसेच पाणबुडय़ांतून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. उत्तर कोरियाच्या ताफ्यात ही क्षेपणास्त्रे पहिल्यांदाच दिसल्याचे सांगण्यात येते. ती खरोखरच आंतरखंडीय असल्यास त्याद्वारे उत्तर कोरिया अमेरिका वा युरोपात कुठेही हल्ला करू शकते.

कॅलिफोर्नियातील ‘जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रॉलिफरेशन’मधील वरिष्ठ संशोधन सहायक मेलिसा हॅनहॅम यांनी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले की, ‘अमेरिकेने एक ‘विधान’ करण्यासाठी म्हणून तेथे कार्ल व्हिन्सन ही युद्धनौका पाठविली आहे. ही नवीन क्षेपणास्त्रे हे उत्तर कोरियाने त्याला दिलेले प्रत्युत्तर आहे. आजवर कधीही ती लष्करी संचलनात दिसली नव्हती. कदाचित ती दोन्हीही अद्याप अभिकल्पाच्या पातळीवरच असतील.’

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अणुबॉम्बहल्ला करता येऊ शकेल अशी क्षेपणास्त्रे तयार करण्याचे उत्तर कोरियाचे प्रयत्न असून, त्यादृष्टीने या देशाने आजवर पाच अणुचाचण्या आणि अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. क्षेपणास्त्रांवर बसवता येऊ शकेल एवढय़ा लहान आकाराचा अणुबॉम्ब आपण तयार केला आहे, असाही या देशाचा दावा आहे. परंतु त्याबद्दल पुराव्यांअभावी विश्वास ठेवता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेला आव्हान

किम इल सुंग यांचा जयंती सोहळा ‘सूर्यदिन’ उत्सव म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने हा देश क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्राची चाचणी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याऐवजी त्यांनी लष्करी संचलनाच्या वेळी केवळ शक्तिप्रदर्शनच केले. सोल इन्स्टिटय़ूट येथील उत्तर कोरिया तज्ज्ञ किम डोंग युब यांनी सांगितले, की रॉकेट लाँचर, तोफा, क्षेपणास्त्रे यात प्रदर्शित करण्यात आली. मुसुदान हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र तसेच दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रेही त्यात होती. १०५ लष्करी विमाने संचलनाच्या ठिकाणी घिरटय़ा मारत होती. या वेळी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉंग उन यांनी भाषणबाजी टाळली. मात्र हे सर्व पाहताना ते अतिशय आनंदित दिसत होते. त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले, तरी त्यांचे जवळचे सहकारी व दुसऱ्या क्रमांकाचे नेते शो रोंग यांनी, अमेरिकेचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास आपला देश तयार असल्याची दर्पोक्ती केली.