अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांची ग्वाही

उत्तर कोरियाचा प्रश्न मोठा अडचणीचा असून तो खंबीरपणे हाताळला जाईल, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. अमेरिका भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदाँ यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकेला सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. मध्य पूर्वेपासून जगाच्या अनेक भागांतून अमेरिकेला धोका उद्भवू शकतो. दहशतवाद हाही चिंतेचा विषय आहे, असे ट्रम्प म्हणाले. गेल्या आठवडय़ात जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांच्याबरोबरील भेट फलद्रूप झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्रुदाँ यांनी अमेरिका व कॅनडा यांच्या परंपरागत चांगल्या संबंधांचा दाखला दिला. पहिले व दुसरे महायुद्ध, कोरिया व अफगाणिस्तानमधील युद्ध यांत दोन्ही देशांचे सैनिक खांद्याला खांदा भिडवून लढले आहेत. मात्र काही वेळा आपल्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत. अशा वेळी ती परिस्थिती दोन्ही देशांनी धीरोदात्तपणे हाताळली आहे, असे त्रुदाँ म्हणाले.