भरकार्यक्रमात डोळा लागल्याने उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याचे वृत्त सोलच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवा विभागाने दिले आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप उत्तर कोरियाने दुजोरा दिलेला नाही. उत्तर कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची हुकुमशाही वृत्ती सर्वश्रृत आहे. गेल्या महिन्यात एका सरकारी कार्यक्रमात संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांचा डोळा लागला होता. या कार्यक्रमाला किम जोंग उन देखील उपस्थित होते. चोल यांच्या झोपाळूपणाने जोंग भलतेच संतापले आणि चोल यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. समोर आलेल्या माहितीनुसार चोल यांना तोफेने उडवण्यात आले असून या अमानुष शिक्षेचा जगभरातून निषेध होत आहे.
२०११ साली वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सुत्रे हाती घेतली. भ्रष्ट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मालिकाच किम जोंग उन यांनी त्यांनी सुरू केली आणि ते चर्चेचे केंद्रस्थान बनले. याआधी अशाच प्रकारे किम जोंग उन यांनी उच्चस्तरिय अधिकाऱयांना अमानुष शिक्षा दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, चोल हे अनेकदा किम जोंग यांच्याशी हुज्जत घालतानाही दिसले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.