उत्तर कोरिया या देशाचं नाव सर्वांनीच ऐकलं असेल. किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते. या देशात कायद्याच्या नावाखाली कोणतीही गोष्ट होणं शक्य आहे. काही दिवसांपूर्वीच अशी एक घटना घडली ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका महिलेला तुरूंगात डांबण्यात आल्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला. त्यामागचं कारण धक्कादायक आहे. त्या महिलेच्या घरात आग लागली होती. यामध्ये त्या महिलेनं आपल्या मुलांना वाचवलं. पण त्यांच्या घरात लावण्यात आलेली किम जोंग उन यांच्या कुटुंबाचा फोटो मात्र जळून खाक झाला. तो फोटो त्या महिलेनं न वाचवल्यानं तिला तुरूंगात डांबण्यात आलं.

उत्तर कोरियामध्ये आता या घटनेचा तपास करण्यात येत आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी या प्रकरणाचा तपास करत आहेत. डेली मेलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार हे प्रकरण चीन सीमेनजीक असलेल्या उत्तर हॅमग्यो प्रांतातील ऑनसाँग काऊंटी येथील आहे. एका घरात दोन कुटुंब राहत होती. या घरात जेव्हा आग लागली तेव्हा घरात केवळ मुलंच होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये मुलांचा जीव तर वाचला पण भिंतीवर लावण्यात आलेल्या किम जोंग उन यांचा कौटुंबिक फोटो आणि अन्य काही फोटो मात्र जळून खाक झाले.

नेत्यांचे फोटो लावणं अनिवार्य
उत्तर कोरियामध्ये नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये माजी नेत्यांचे फोटो लावणे बंधनकारक आहे. या महिलेच्या घरातही किम इल संग आणि जोंग इल यांचे फोटो होते. नागरिकांनी आपल्या घरात हे फोटो लावले आहेत की नाही याचा तपास करण्यासाठी पोलिसांनाही घराघरात पाठवलं जातं. तसंच एका व्यक्तीप्रमाणे त्यांचा साभाळ करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येतं. या फोटोंचा अवमान हा एखाद्या गुन्ह्याप्रमाणे असतो.

मुलं रुग्णालयात पण…
या घटनेत मुलं जखमी झाली आहेत. तसंच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु त्या महिलेला आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे तोपर्यंत या महिलेला तुरूंगातच रहावं लागणार आहे. जर या प्रकरणी ही माहिला दोषी आढळली तर मोठ्या कालावधीसाठी या महिलेला तुरूंगातच रहावं लागणार आहे.