जगातील सुमारे १५० देशांना ज्याचा नुकताच फटका बसला त्या सायबर हल्ल्याचा संबंध उत्तर कोरियाशी असावा, असा अंदाज गुगलमधील भारतीय तंत्रज्ञाने व्यक्त केला आहे. नील मेहता असे त्या तंत्रज्ञाचे नाव असून त्यांनी ट्विटरवर एक कोड प्रसिद्ध केला आहे, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

या विषयातील तज्ज्ञांच्या मते वान्नाक्राय या रॅन्समवेअरचा हा कोड उत्तर कोरियातील लॅझारॉस ग्रुप नावाच्या हॅकर्सच्या गटाशी संबंधित आहे. त्यांनीच २०१४ मध्ये सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेंट आणि गेल्या वर्षी बांगलादेश सेंट्रल बँकेवर सायबर हल्ला केला होता, त्या वेळच्या कोडशी हा कोड मिळताजुळता आहे.

सायबर सुरक्षातज्ज्ञ प्राध्यापक अ‍ॅलन वुडवर्ड यांच्या मते वान्नाक्राय विषाणूशी संबंधित कोड कार्यान्वित होण्याची वेळ चीनच्या प्रमाणवेळेशी मिळतीजुळती आहे. तसेच कोडमधील इंग्रजी मूळ चिनी भाषेचे संगणकाने केलेले भाषांतर असल्यासारखे वाटत आहे. मात्र त्यावर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे वुडवर्ड म्हणाले.

नील मेहता यांचे संशोधन या सायबर हल्ल्याबाबतचे सर्वात महत्त्वाचे संशोधन असल्याचे रशियातील सायबर सुरक्षा कंपनी कास्परस्कीने म्हटले आहे. मात्र याबाबत अंतिम निष्कर्षांप्रत पोहोचण्यापूर्वी आणखी संशोधनाची गरज असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.