उत्तर कोरियाच्या नेत्यांचा आदेश, सेऊलच्या गुप्तचर यंत्रणांची माहिती
उत्तर कोरियाने अलीकडेच अणुचाचणी करून क्षेपणास्त्रनिर्मिती केल्यानंतर आता दक्षिण कोरियावर हल्ला करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त हाती आले आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जाँग ऊन यांनी दक्षिण कोरियावर हल्ले करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनी सत्तारूढ पक्षाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने खळबळ माजली आहे.
दक्षिण कोरियावर सायबर आणि अन्य प्रकारचे हल्ले करण्याची क्षमता आहे, हे सिद्ध करण्यासाठी किम यांच्या आदेशाची अमंलबजावणी करण्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी तयारी सुरू केली असल्याचे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी सत्तारूढ पक्षाच्या अधिकाऱ्याला दिलेल्या माहितीमधून स्पष्ट झाले आहे.
उत्तर कोरिया सातत्याने दक्षिण कोरियावर हल्ले चढवीत असल्याचा इतिहास आहे. मात्र उत्तर कोरियात नक्की कोणती योजना आकार घेत आहे हे स्वतंत्रपणे जाणून घेणे अशक्य आहे. दक्षिण कोरियातील सत्तारूढ पक्षाची एक गुप्त बैठक झाली त्यामध्ये उत्तर कोरियाची हल्ले करण्याची योजना कशी समजली, त्याबाबत चर्चा झाली का, हे सांगण्यास सत्तारूढ पक्षाच्या अधिकाऱ्याने नकार दिला. माध्यमांशी बोलण्याचे अधिकार नसल्याने आपले नाव गुप्त ठेवण्यात यावे, अशी विनंती या अधिकाऱ्याने केल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर कोरियाच्या विरोधात काम करणारे कार्यकर्ते, दलबदलू आणि सरकारी अधिकाऱ्यांना हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. उत्तर कोरियाचा मुकाबला करण्याचा उद्देश स्पष्ट होईल अशा पद्धतीने अमेरिकेची लढाऊ विमाने दक्षिण कोरियावर घिरटय़ा घालत असताना दिसल्यानंतर वरील माहिती समोर आली आहे.
जपानमधील अमेरिकेच्या तळावरून आलेल्या विमानांचा उत्तर कोरिया संभाव्य इशारा म्हणून आढावा घेण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाच्या हल्ल्यापासून दक्षिण कोरियाचा बचाव करण्यासाठी अमेरिका काय करू शकते हे दर्शविणे हा त्यामागील उद्देश आहे. दक्षिण कोरियात किती कालावधीसाठी एफ-२२ विमाने तैनात केली जाणार आहेत ते अमेरिकेचे लष्कर सांगू शकत नाही.
उत्तर कोरियाबरोबर संघर्षांचा प्रसंग येताच अमेरिका नेहमीच दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमाने पाठविते. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने अणुचाचणी केल्यानंतर अमेरिकेने अण्वस्त्र क्षमतेची बी-५२ बॉम्बर विमाने पाठविली होती.